मुंबई : राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (सोमवारी) परिपत्रक जारी केलं. त्यामुळे आता नागपूरसह भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदाची जबादारीही बावनकुळेंवर असणार आहे.


गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तिथे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यात पक्ष वाढीच्या कामाची मोठी जबाबदारी बावनकुळेंवर असणार आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र आता त्याजागी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.