Nagpur News : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विधिमंडळाचे नागपुरात होणारे अधिवेशन गेले दोन वर्ष होऊ शकलेलं नाही. नागपुरात हिवाळी अधिवेशन (Nagpur) यापूर्वी 2019 मध्ये झाले होते. यंदा मात्र 19 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. 10 डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. रविनगर परिसरातील बंगल्यांच्या रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. 


यावर्षी अधिवेशनावर 98 कोटींवर खर्च येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अधिवेशनापेक्षा 30 कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. 2019 मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण 68 कोटी रुपये खर्च झाले होते. दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याने सर्वच उत्सुक आहेत. 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशनं इथं होऊ शकले नाही.


आघाडीच्या दुसऱ्या वर्षांच्या काळात कोरोना ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईतील झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती.


शिंदे गट- भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूरला होईल, असे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामांना सुरुवात केली आहे.


कंत्राटदारांकडून दिला होता कामबंदचा इशारा


आधीच्या अधिवेशनादरम्यान केलेल्या कामांचे देयक दिले नाही म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला कंत्राटदाराच्या बहिष्काराचा इशार दिला होता. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीच्या कामावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीरही केले होते. मागील तीन वर्षांपासून सुमारे 200 कंत्राटदारांचे नागपूर परिसरातील विविध कामांसाठीचे 122 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकल्यामुळे नागपूर कॉन्टॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठीचे काम स्वीकारण्यास नकार दिला होता. हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातली कुठलीही कामे स्वीकारणार नाही, करणार नाही, तसेच वर्क ॲार्डर देखील घेणार नाही अशी कंत्राटदारांची भूमिका होती.


हेही वाचा


Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवरची सुनावणी वेळेअभावी पुढे ढकलली, उद्या होणार सुनावणी