Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते. परंतू, त्या काळात पाऊस पडलाच नाही. याच मुद्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हवामान विभागावर (Meteorological Department) टीका केली. पवार यांनी हवामान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजित पवारांच्या टिकेनंतर पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत होसाळीकर


अजित पवार यांनी हवामान विभागावर टीका केल्यानंतर पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचना नीट वाचल्या जात नाहीत. हवामान विभागानं फक्त घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. तो बऱ्यापैकी पूर्ण झाला असल्याचे होसाळीकर यांनी म्हटलं आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यावेळी त्यांनी वेळोवेळी आमच्या विश्वास टाकला आहे. आमचं काम कशा प्रकारे चालते हे देखील त्यांना माहिती आहे. मात्र, त्यांनी अचानक अशी भूमिका का घेतली हे आम्हाला माहित नसल्याचे होसाळीकर म्हणाले. हवामान विभागाकडे बऱ्यापैकी यंत्रसामग्री असून, केंद्र सरकार पुरेपूर निधी वेळोवेळी हवामान विभागाला देत असते. पुढच्या पंचवीस वर्षाचे नियोजन हवामान विभागाकडे तयार असल्याचे होसाळीकर म्हणाले.


अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?


हवामान खात्याचे अंदाज सध्या चुकत आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही. मात्र, शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्यावर केंद्र सरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर हवामान विभागाने उत्तर दिलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: