मुंबई : नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीची घटना घडल्या आहेत. दरम्यान केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नागरिकत्व विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सगळ्या शंका दूर करण्यात येतील. तसंच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र तुकडे तुकडे गँगशी चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे'.
रविशंकर प्रसाद म्हणाले, 'आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र तुकडे-तुकडे गँग, शहरी नक्षलवादी किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करणार नाही. ही आंदोलनं आमच्या राजकीय विरोधकांकडून पुरस्कृत आहेत. नागरिकत्व कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाला लागू होत नाही. यामध्ये भारतीय मुस्लिमांचाही समावेश आहे. त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. ते भारताचे नागरिक म्हणून कायम राहतील.
आंदोलन झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. अनेक लोक जाहीरपणे नरेंद्र मोदींना मत न देण्याचं आवाहन करत आहेत. ते सर्व मोदींचा द्वेष करणारे आहेत, असे देखील रवीशंकर प्रसाद म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश, लखनौमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे प्रकार झाले आहेत. देशभरातील डाव्या संघटनांनी आज देशभर एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. काही ठिकाणी संचारबंदी तर, अनेक मुख्य शहरांत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यातील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले असून शांततेत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांसह काही बॉलिवुड सेलीब्रीटींनीही उपस्थितीत लावल्याचे पाहायला मिळाले. या अगोदर नाशिकच्या मालेगावमध्येही मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
CAA Protest | कितीही आंदोलनं झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2019 05:55 PM (IST)
हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचाही आहे असं वक्तव्य केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सगळ्या शंका दूर करण्यात येतील असं देखील रविशंकर प्रसदा म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -