लातूर : संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लातूर जिल्ह्यात देखील प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. यासोबतच लातूर जिल्ह्यातील उजेड या गावात महात्मा गांधीजींच्या विचारांचा उत्सव साजरा करत पाच दिवसांची यात्रा भरवली आहे. या यात्रेनिमित्त गावात दोन दिवसात तब्बल 6000 किलो पेक्षा जास्त जिलेबी खाल्ली जाते. महात्मा गांधीजींच्या विचारांची पाळेमुळे या गावात खोलवर रुजली आहेत. त्यामुळे दर वर्षी या गावात गांधी विचारांची यात्रा भरवली जाते. 1952 पासून सुरू झालेली ही परंपरा आज देखील जपली जात आहे. 


लातूर जिल्ह्यातील उजेड या गावाचे मूळ नाव हिसामाबाद असे आहे. या गावात यात्रेच्या दरम्यान दोन दिवसात 6000 किलो पेक्षा जास्त जिलेबी फस्त केली जाते. यासह अनेक कारणांमुळे हे गाव नेहमीच चर्चेत असते. 


अशी सुरूवात झाली यात्रेची 


गावामध्ये पिराची यात्रा भरवायची की महादेवाची यात्रा भरवायची यावरून वाद निर्माण होऊ लागले. त्यावेळी गावातील काही सुजाण नागरिक एकत्र आले आणि आपण गांधीबाबाची यात्रा सुरू करू असा प्रस्ताव ठेवला. गावातील सर्व समाजातील लोकांनी एकमुखाने या निर्णयाला मान्यता दिली. त्यासाठी यात्रेचा दिवस ठरला 26 जानेवारीचा. या निर्णयानंतर गावकऱ्यांनी महात्मा गांधीचा पुतळा बनवून आणण्यात आला. गावाच्या मुख्य चौकात तो पुतळा उभारण्यात आला. यात्रेसाठी गावात रंगरंगोटी, पताका लावण्यासह संपूर्ण गावात रांगोळी काढली जाते. ग्रामदेवतेच्या यात्रेसारखी संपूर्ण तयारी करण्यात येते. गांधीबाबाच्या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असतं ते राष्ट्रगीताचं. 26 जानेवारीला सकाळी गांधी चौकातील गांधी बाबाच्या पुतळ्यासमोर सर्वजण एकत्र येतात. राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत आरती ऐवजी राष्ट्रगीत गायले जाते. महात्मा गांधींना अपेक्षित असणारं खेडेगाव उजेडमध्ये पाहायला मिळतो. तत्कालीन गाव प्रमुख आणि जमीनदार असलेले चांद पटेल यांनी सर्वानुमते पुढाकार घेत यात्रेला सुरुवात केली. 


सुरूवाच्या वर्षांमध्ये यात्रेचे स्वरूप खूप वेगळे होते. गावातील प्रमुख असलेले चांद पटेल हे घोड्यावर बसून हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरीच्या सर्वात पुढे असत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याअख्याने घेण्यात येत असत. यात्रेची सुरुवात 1 जानेवारी पासूनच होत असे. बदलत्या काळात ही यात्रा पाच दिवसावर आली आहे. 


स्वात्रंत्र पूर्व काळात या भागात वीज नसताना जनरेटरद्वारे या गावात रात्री दिवे लावण्याचे काम जमीनदार चांद पटेल यांनी केले होते. संपूर्ण गावात उजेड करण्यात आला होता. त्यावेळीपासून या गावाचे नाव हिसामाबाद ऐवजी उजेड पडले. संपूर्ण भारतात गांधी विचाराने प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने राहणारे हे गाव आहे. हिंदू-मुस्लिम आणि इतर धर्मीय लोक गावात अतिशय एकोप्याने राहतात. हे गाव गांधी विचाराचे केंद्र झाले आहे. मात्र याकडे गांधी विचाराच्या विचारवंत आणि सरकारचे कायमच दुर्लक्ष झाल्याची खंत गावकऱ्यांना आहे.
 


दोन दिवसांत 600 किलो जिलेबी रिचवतात


कोणत्याही गावाची यात्रा म्हटल्यानंतर खेळण्याची, विविध वस्तूंची दुकाने आणि त्याबरोबर खाण्यापिण्याची चंगळ असतेच. तसेच उजेड या गावात ही पहावयास मिळते. मात्र येथील एक खासियत आहारात साखर नको म्हणणार यांना धडकी भरवणारी आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल तीस क्विंटल साखरेपासून 6000 किलोची जिलेबी इथे फस्त केली जाते. येथील मुख्य दोन हॉटेल आणि त्याचबरोबर अनेक स्टॉलमधून गांधीबाबाच्या यात्रेचा प्रसाद म्हणून जिलेबी खाल्ली आणि दिली जाते. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात सहा हजार किलो जिलेबी विकली जाते. येथील जिलबी एवढी प्रसिद्ध आहे की अरब देशात गेलेली येथील लोक पार्सल घेऊन जातात. 


महत्वाच्या बातम्या


Latur News : महात्मा गांधींच्या नावानं यात्रा भरवणारं देशातलं एकमेव गाव, वाचा 'उजेड' गावची 71 वर्षांची परंपरा