लातूर : एकीकडे पाणीटंचाईमुळे होरपळणाऱ्या लातूरला रेल्वेने पाणी देण्यात आलं, मात्र पाण्याच्या नासाडीबद्दल प्रशासन काही गंभीर नसल्याचं चित्र आहे. शहरातल्या रिंग रोड परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या वॉल्वची क्लिप निघाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून हा प्रकार घडत होता. यातून निघणारं पाणी हे आजूबाजूच्या शेतात वाहून जात असल्याचं पाहून नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली, पण कित्येक वेळ एकही कर्मचारी या जागी फिरकलाच नाही.
काही काळानंतर आलेल्या कर्मचाऱ्याने हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश आलं नाही. यातील गंभीर प्रकार म्हणजे रेल्वेने आलेलं पाणी शुद्धीकरण करुन शहरात पोहचवणाऱ्या वॉल्वमधूनच पाणी वाया गेल्याने प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.