Latur Water News:  लातूर जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये चार फुटाची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरून गेले आहेत. यामुळं दुष्काळी लातूर पाण्याचा सुकाळ आल्याचं बोललं जात आहे.  2016 साली भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्याचे चित्र मागील काही वर्षात हळूहळू बदलत चाललं आहे. 2016 नंतर पावसाने दरवर्षी जिल्ह्यात उत्तम साथ दिली आहे. त्याचे दृश्य परिणाम आता पहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षात चार फुटाने वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. पावसाने यावर्षी प्रत्येक भागामध्ये 100 पेक्षा जास्त सरासरी गाठली आहे.  
  
लातूर जिल्ह्यातील मागील पाच वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास करता यावर्षी पाणी पातळी चार फूट वाढली आहे. जिल्ह्यातील 109 निरीक्षण विहिरीचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 2011 पासून 2016 पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रमाणात होणाऱ्या तफावतीमुळे जिल्ह्यात 2016 साली दुष्काळाचा सामना करावा लागला होता. 


2016 च्या दुष्काळानंतर आजपर्यंत पावसाने जिल्ह्याला उत्तम साथ दिली आहे. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. लातूरसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.  सहा वर्षांपासून पाणीटंचाई नाही. मांजरासह इतर प्रकल्पही भरले आहेत. गेल्या सहा वर्षापासून लातूर शहरात वा जिल्ह्यात पाणीटंचाई नाही. गेली सहा वर्षे चांगला पाऊस पडत असल्याने टंचाई नाही. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा नदीवरील बॅरेजेसही दरवर्षी भरलेले आहेत. यंदाही जुलै महिन्यातच अनेक बॅरेजेसमधून पाणी सोडून द्यावे लागले आहे.


मध्यम प्रकल्पांतीलही पाणीसाठा 100 टकक्यांपर्यंत पोहोचला


जिल्ह्यातील तावरजा, रेणा, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, धरणी, मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये चांगला संचय झालेला आहे. तावरजा वगळता रेणा, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा प्रकल्प 98  टक्क्यांच्या वर भरले आहे. यामुळे यंदाही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. मांजरा प्रकल्पाच्या खाली मांजरा नदीवर 15 बॅरेजेस आहेत.या बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध झालेले आहे. नियमानुसार या बॅरेजेसमधून विसर्ग केला आहे.लासरा, बोरगाव- अंजनपूर, वांजरखेडा, टाकळगाव देवळा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, साई, नागझरी, शिवणी, खुलगापूर, बिंदगीहाळ, डोंगरगाव, धनेगाव, होसूर या बॅरेजेसचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने उत्तम साथ दिली आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊसमान झालं आहे. अनेक दिवसापासून कोरड्या पडलेल्या विहिरी आता पाण्याने तुडुंब भरलेल्या दिसून येत आहेत.


ही बातमी देखील वाचा