काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली. औसा, उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. औराद शहाजानीत 90 मिनिटात 94 मिमी पावसाची नोंद झाली.
जोरदार पावसामुळे बसस्थानकातही पाणी शिरलं होतं. तसेच बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी गेलं. तेरणा नदीच्या खोलीकरणाचं काम चार किलोमीटर झालं असून ही नदीसुद्धा दुथडी भरुन वाहत आहे.
पाहा फोटो :
दुष्काळग्रस्त लातुरात पूरस्थिती
जळगावात पावसामुळे वाहतूककोंडी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात डोंगरी आणि तितूर नदीला पूर आला. त्यामुळे काही काळ औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. पुलावर पाणी आल्यामुळे घाट रोड परिसरात मोठी वाहतूककोंडीही पाहायला मिळाली.
तळेगाव परिसरात पुरामध्ये चार रिक्षा आणि दोन मोटारसायकल वाहून गेल्या. यावेळी पुरात एक तरुणही वाहून जात होता, मात्र या तरुणाला वाचवण्यात यश आलंय. जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आला.
नंदुरबारमध्ये शाळेचे पत्रे उडाले
नंदुरबार जिल्ह्यातल्या सरदार सरोवर, सातपुडा परिसरात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला. सरदार सरोवर परिसरातल्या मणिबेली परिसरातल्या शाळेवरचे पत्रे उडून गेले आहेत. सुदैवानं यात कुठल्याच विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. वाऱ्यासोबतच जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे पुढचे काही दिवस शाळा बंद ठेवली जाणार आहे.