लातूर: मराठवाड्यातील पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस गहिरं होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. लातूरमधील परिस्थिती तर खूपच भीषण आहे.
त्यामुळेच लातूर आणि बीड इथल्या कारागृहांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही कैद्यांना नाशिक आणि धुळे येथील कारागृहात हलविण्याची चाचपणी कारागृह प्रशासनाने केली.
लातूर आणि बीड जिल्ह्यात सुमारे ३५० कैदी आहेत. कारागृहात पाणी कमी पडत होते. मात्र, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तूर्त ३ टँकर उपलब्ध केले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास १०० कैद्यांना धुळे आणि तेवढय़ांनाच नाशिक कारागृहात हलविण्याची तयारी सुरू आहे, असे औरंगाबाद विभागाचे कारागृह महानिरीक्षक राजेंद्र धाम्हणे यांनी सांगितले.