लातूर : एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेला ऊसतोड कामगारांचा मुलगा राहुल पवार याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यात पोस्ट कोविड आजाराने ग्रासले. यासाठी इंजेक्शनसाठी मोठा खर्च होत आहे. राहुलच्या घरची परिस्थिती बिकट आहे. परभणी जिल्ह्यातील हा तरुण अंत्यत प्रतिकूल परस्थितीवर मात करत डॉक्टर होतोय. या पार्श्वभूमीवर एमआयटी मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, कर्मचारी, विद्यार्थी यांनी पुढाकार घेत मदतनिधी उभा केलाय. मात्र, आता इंजेक्शन मिळवून द्या, असं साकडं या सर्वांनी सरकारला घातलं आहे.


आजपर्यंत झालेला खर्च असेल किंवा होणारा खर्च असेल तो एमआयटी मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, कर्मचारी, विद्यार्थी उभा करतील असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. मात्र, यात समस्या आहे ती राहुलसाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनची. हे इंजेक्शन बाजारात मिळत नाहीय, सरकारच्या यंत्रनेचे त्यावर कंट्रोल आहे. त्यास आवश्यक असणारे सगळे इंजेक्शन प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती एमआयटी मेडिकल कॉलेजचे डीन नबाबसाब जमादार यानी केली आहे. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना मेल करण्यात येत आहेत. डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. एमजीएम प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून राहुलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत, अशी ही माहिती जमादार यानी दिली आहे.


कालपासून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील कारवा फाऊंडेशनच्या आदिती पाटील कौलखेडकर यांना याची माहिती मिळाली. त्यांनी राहुलच्या वर्गमित्राशी चर्चा केल्यानंतर कारवा फाऊंडेशन मदतीला पुढे आले. यानंतर त्याच्या एनजीओने यासाठी मदतीचे आवाहन केले. कारवा फाऊंडेशनच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मागील काही दिवसातील हॉस्पिटलचे बिल अडीच लाख होते ते गोळा करावे असा उद्धेश त्यांचा होता. त्यानुसार अवघ्या 35 तासात अडीच लाखांची रक्कम उभी राहिली आहे. आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ह्या कामात राहुल यांच्या वर्गमित्राची साथ होती. आम्ही यात निमित्तमात्र आहोत, असे मत आदिती कौलखेडकर यांनी व्यक्त केले आहे. 


राहुलच्या वर्गमित्रांनी विविध सामाजिक संस्थेने एकत्र येत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अवघ्या काही तासांत अडीच लाख रुपये जमा झाले. आता एमआयटी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने ही संपूर्ण आर्थिक जबाबदारी घेतली आहे. गरज आहे ती इंजेक्शनची त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉक्टर होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या तरुणास मदत करण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत.