लातूर : सरकारला 16 कोटींचा चुना लावणाऱ्या लातुरातल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश झाला आहे. चोरीछुपे आंतरराष्ट्रीय कॉल्स चालत असल्याने तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.


लातूरच्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शंकर बिरादारचा कारनामा समजल्यानंतर, पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. या पठ्ठ्यानं घरात चक्क अवैध टेलिफोन एक्स्चेंज सुरु केलं होतं. या टेलिफोन एक्स्चेंजच्या मदतीनं चोरी छुपे आंतरराष्ट्रीय कॉल्स केले जायचे.

लातूरच्या प्रकाश नगरमध्ये भाड्याच्या घरात सुरु केलेल्या गोरखधंद्याचा सुगावा, जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी विरोधी पथकाला लागला. त्यांनी लागलीच स्थानिक दहशतवादी पथकाला सावध केलं.
पोलिसांनी छापा मारला आणि कारवाई केली.

लातुरमध्ये अवैध STD सेंटरचा पर्दाफाश, पाकला लष्कराची माहिती पुरवल्याचा संशय


शंकर बिरादारला अटक केल्यानंतर पोलिसांना लातुरातल्या आणखी एका अवैध टेलिफोन एक्स्चेंजची माहिती मिळाली. बिरादारसह रवि साबदेच्या घरांवर छापा मारुन पोलिसांनी साडेचार लाखांची यंत्रसामुग्री जप्त केली. तसंच आरोपींकडे बीएसएनएल कंपनीचे 96 सिम कार्डस मिळाले आहेत.

बिरादार आणि साबदेनं सुरु केलेल्या टेलिफोन एक्स्चेंजवरुन कुणाला कॉल केले गेले, या टेलिफोन एक्स्चेंजचा वापर देशविघातक कृत्यांसाठी तर करण्यात आला नाही ना? या प्रश्नांनी आता डोकं वर काढलं आहे.