नागपूर : नागपुरात 20 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी महाराष्ट्राबाहेरील असून नागपुरातील वसतिगृहात राहून एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
नागपुरात सेमिनरी हिल परिसरातल्या निर्जन वनक्षेत्रात शुक्रवारी रात्री तरुणीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. ज्या स्कॉर्पियोमधून अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली, ती नागपुरातील एका मोठ्या रेल्वे अधिकाऱ्याकडे कंत्राटी पद्धतीने लावलेली टॅक्सी कार असल्याची माहिती आहे.
पीडित तरुणी उन्हाळी सुट्ट्यांनंतर आपल्या मूळ गावातून नागपुरात दाखल झाली होती. तिच्यासोबत तिची आईही नागपुरात आली होती. मायलेकी शॉपिंग केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवल्या. रात्री अकराच्या सुमारास दोघी गांधीनगर परिसरात नातेवाईकाच्या घराकडे परतत असताना आई आणि पीडित तरुणीत कुठल्यातरी मुद्द्यावर वाद झाला. एका वळणावर कार थांबताच तरुणी रागाच्या भरात कारमधून उतरुन पायी निघून गेली.
पीडितेच्या 50 वर्षीय आईने तिला थांबवण्याचे प्रयत्न केले, मात्र ती थांबली नाही. नातेवाईकाचे घर जवळच असल्याने आणि तरुणी गेली दोन वर्ष नागपुरात शिक्षण घेत असल्यामुळे तिला परिसर माहित असल्यामुळे राग शांत झाल्यावर ती घरी परत येईल, असा विचार करुन आईने तिचा पाठलाग केला नाही.
गांधीनगर परिसरात सार्वजनिक वाचनालयाजवळ रात्रीच्या अंधारात स्कॉर्पियोने आलेल्या आरोपीने तरुणीचं अपहरण केलं. सेमिनरी हिल्स परिसरात निर्जन वनक्षेत्रात स्कॉर्पियो थांबवून कारच्या आतच अतिप्रसंग केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. आरोपी राजेश चिखलोंडेने बलात्कारापूर्वी जोरदार मारहाण केल्याचंही तिने म्हटलं आहे.
मारहाणीत तरुणी जखमी झाली असून भीतीमुळे तिने आरडाओरडा केला नाही. घटनेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने सेमिनरी हिल्स परिसरातच एका कॉलेजजवळ तिला फेकून दिलं आणि पळ काढला.
काही लोकांच्या मदतीने पीडित तरुणी पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित स्कॉर्पियोचा शोध घेत आरोपी राजेश चिखलोंडेला अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे घटनेत वापरलेली स्कॉर्पियो नागपुरात रेल्वेमध्ये कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कंत्राटी पद्धतीने लावलेली टॅक्सी कार आहे. आरोपी राजेश त्यावर चालक म्हणून कार्यरत आहे.