लातूर : लातूर-मुंबई एक्स्प्रेस कर्नाटकमधील बिदरहून सोडण्यास विरोध करत लातूर आणि उस्मानाबादेत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये दोन्ही शहरातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकिल आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले होते.
लातूर-मुंबई एक्सप्रेसचे विस्तारीकरण करुन रेल्वेने ही एक्सप्रेस बिदरहून सोडण्यास सुरुवात केली आहे. पण याविरोधात सध्या लातूरमधील सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कारण लातूरवरुन मुंबईला जाण्यासाठी मागील दहा वर्षांपासून हक्काची एकमेव असलेली ही गाडी बिदरपर्यंत नेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बिदर आणि उदगीरमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे लातूरमधील प्रवाशांना गाडीत जागाच मिळत नाही. याच कारणामुळे सध्या लातूरकर आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात आज लातूर आणि उस्मानाबादेत बंद पाळण्यात आला. या बंदवेळी लातूरमधील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
तर दुसरीकडे उस्मानाबादमध्ये लोकांनी शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढला, आणि रेल्वेच्या निर्णयाविरोधात घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सह्याचं निवेदन देऊन यावर लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केलं. अन्यथा रेलरोको करण्यात येईल असा इशारा दिला.