नागपूर : अदानी आणि इंडिया बुल्स या कंपन्यांकडून वीज निर्मिती कमी झाल्यामुळे महाराष्ट्रासमोर भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे म्हणत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अदानी आणि इंडिया बुल्सला जबाबदार धरले आहे.


“अदानी आणि इंडिया बुल्स कंपन्यांना कोळसा न पोहोचल्यामुळे हा प्रश्न उत्पन्न झाला आहे. मात्र, सरकारने या कंपन्यांची बैठक घेऊन, काहीही करुन वीज ही कराराप्रमाणे द्यावीच लागेल, असे कंपन्यांना सांगितले आहे.”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शिवाय, येत्या 7 ते 8 दिवसात सर्व स्थिती नियमित होईल, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिले.

महावितरणनं चार तासांचे भारनियमन सुरू केल्यानं जनतेला ऐन उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. मंत्री बावनकुळे यांनी भारनियमनाला अदानी आणि इंडिया बुल्सला जबाबदार धरलं आहे.

प्रत्यक्षात तीव्र उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यात औष्णिक विज निर्मीतीचे कांही संच बंद पडलेत, कांही देखभाल-दुरुस्तीसाठी आधीपासून बंद होते आणि कोयना धरणातलं पाणी संपल्याने वीज निर्मिती थांबली आहे.