Latur earthquake : लातूरकरांना भूकंप म्हटलं की आजही अंगावर काटा येतो. 1993 साली गणेश विसर्जनाच्या दिवशी पहाटे भूकंपाचा (Maharashtra Earhquake News) धक्का बसला होता. त्यात हजारो लोकांचे प्राण गेले होते. जुन्या आठवणींमुळे सर्व नागरिक अजूनही भीतीच्या सावटाखाली असतात. अशात लातूर जिल्ह्यातील हासोरी गावात मागील 15 दिवसापासून अनेक वेळा भूगर्भातून मोठा आवाज येत होता. याची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती. प्रशासनानं त्याची भूकंपमापन यंत्रणेवर नोंद नाही, या भूगर्भातील हालचाली आहेत, असं सांगितलं होतं. मात्र सततच्या आवाजामुळे गावकरी चिंतेत होते. दिल्ली, मुंबई आणि लातूरच्या पथकाने तपासणी केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी  तो आवाज म्हणजे भूकंपच असल्याचं सांगितलं आहे. या सर्व कारणामुळे लातूरमध्ये आता चिंतेचे  वातावरण आहे.


2.2 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दिली. मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. प्रशासनाने मात्र भूकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते.


कधी झाला भूकंप
शुक्रवारी पहाटे 3.38 मिनिटांनी 2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून त्याची नोंद भूकंप मापक वेधशाळेने घेतली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेपासून 52 किलोमीटर अंतरावर हासोरी परिसरात यांचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली 5 किलोमीटर अंतरावर तो असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रीय भूकंप केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे शास्त्रज्ञ राजीव कुमार, अजयकुमार शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भूगर्भशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रा.डॉ.अविनाश कदम, प्रा. डॉ. अर्जन भोसले हे उपस्थित होते.


15 दिवस काय झाले होते


हासोरी येथे 15 दिवसात सात ते आठ वेळा भूगर्भातून आवाज झाले. या आवाजाने नागरिकांत भीतीचे वातारण असून नागरिक रात्र जागून काढत आहेत.काही दिवसापूर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास भूगर्भातून जोरदार आवाज आला.  दिवसभर थकून आलेल्या लोकां झोपण्याच्या तयारीतच असताना या आवाजाने लोकांची अक्षरश: भीतीने गाळण उडाली होती. हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकत लोकांनी घरातून बाहेर पळून जाणेच सोयीस्कर समजले. मागील काही दिवसापासून लातूरमध्ये पावसाची रिपरीप सुरू आहे. अशा पावसाळी दिवसात घरात राहता येईना आणि बाहेरही जाता येईना अशी परिस्थिती आहे. प्रशासनाने गावांना या तात्काळ भेटी दिल्या. मागील अनेक दिवस प्रशासन भूगर्भातील हालचालीमुळे हा आवाज येतोय असं सांगत होते. मात्र गावकरी वेळोवेळी हा भूकंपच आहे यावर ठाम होते. अखेर तेच खरं झालं आहे.