लातूर: लातूर जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतच जात आहे. काल लातूर जिल्ह्यात 414 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 9115 वर गेला आहे. काल नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यूचा आकडा हा 305 वर गेला आहे. 2241 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 6569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. लातूर आणि उदगीर पाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.


लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्ण संख्या वाढतच चालली असताना आता छोट्या मोठ्या गावातही दुहेरी आणि तिहेरी आकड्यात रुग्ण संख्या गेली आहे. लातूर जिल्ह्यातील बाजारपेठ असलेले गाव म्हणजे मुरुड. या गावात कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी पार केला आहे. काल एकाचा दिवसात 30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील तीन लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे आणि 17 नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे गावात दशहत पसरली आहे.

गावात अवघ्या काही दिवसात सहा लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत असलेले सर्वात मोठे गाव. नावाजलेली बाजारपेठ असलेल्या या गावात उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील व्यापारी येत असतात. गावातील अनेक व्यापारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे गावकरी सतर्क झाले आहेत. या भागातील 60 पेक्षा जास्त गावाचा बाजार आणि व्यवहार मुरुड येथे होत असतो. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आता जनता कर्फ्यूचा विचार पुढे आला आहे.

यावर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचयतीने आता पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. येत्या सोमवारपासून पुढील पाच दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. या काळात गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यूच्या पाच दिवसाच्या काळात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात दिवसभर फिवर क्लिनिक सुरू करून एक हजार अँटीजन किटद्वारे संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावातील अनेक रुग्ण सर्दी, ताप आणि खोकला झाल्यास औषध विक्रेत्या जात त्यावर औषधे घेत घरीच उपचार घेत गावभर फिरत आहेत. यातून कोरोनाचा धोका वाढला आहे. अशी औषधे घेण्यासाठी कोणीही आले तर त्याची माहिती ग्रामपंचयत कार्यालयास करने बंधनकारक करण्यात आले आहे. अशा  रुग्णांची अॅंटीजन टेस्ट केल्याशिवाय त्यास औषध विक्री करु नये असा निर्णय घेण्यात आला आहे.अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी गावातील खासगी डॉक्टर यांनी करु नये. अशा रुग्णास सरळ ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा त्या व्यक्तिची तपासणी सह इतर बाबी ग्रामपंचायत करवून घेईल. तपासणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या तपासणी करण्यात येणार आहे.