मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असताना मुख्यमंत्र्यांनी ही नेमणूक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेल्या काही नियुक्त्या या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात कारभार सुरू केल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता आणि त्यांची गट्टी जमली. अजोय मेहता यांची प्रत्येक शासकीय निर्णयातील वर्चस्व, घेतलेले निर्णय बदलण्यासाठी वापरलेले वजन यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला. अजोय मेहता यांच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजी होती. ती नाराजी पाहता अखेरीस उद्धव ठाकरे यांनी अजोय मेहता यांना मुदतवाढ न देता त्यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली.


या माध्यमातूनही अजोय मेहता हे अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते शासकीय निर्णयात आपला ठसा उमटवून आहेत. कोरोना काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी सुसाट आहे. दररोज मंत्रालयात जास्त काळ उपलब्ध असणारे एकमेव मंत्री म्हणजे अजित पवार. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचा दबदबा जास्त. अजित पवार यांच्याच मर्जीने पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त इथे अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. याशिवाय पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, अमहदनगर, सोलापूर इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांचे वर्चस्व आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी सनदी अधिकारी दीपक म्हैसकर यांची नियुक्ती केली आहे.


पुण्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या, पत्रकार पांडुरंग रायकर आणि माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या निधनानंतर पुण्यातील आरोग्य व्यवस्था, उभारलेली जम्बो हॉस्पिटल यावर सर्व स्तरातून टीका होत आहेत. पुण्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊ नये, असे मुख्यमंत्र्यांचे मत असताना पुण्यात ती शिथिलता देण्यात आली त्यावरून संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते.


त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुणे विभागासाठी माजी सनदी अधिकारी दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली. पुण्यातील वाढती रुग्ण संख्या ही पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे बोट दाखवणारी आहे. त्यांच्याच मर्जीतले अधिकारी या भागात आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील माजी सनदी अधिकाऱ्याला सल्लागार नेमत पुणे विभागावर आपले समांतर वर्चस्व तयार करत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली.


आधीच अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची निर्णय प्रक्रियेतील सहभागाबाबत नाराजी आहे. त्यात आता पुण्यात पण एक माजी सनदी अधिकारी सल्लागार म्हणून नेमल्याने पुणे पालकमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.