Latur: लातूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा चोरटा गटारात सापडला. जनावरं चोरणारा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आणि पोलिसांना गटारातल्या घाणीत माखलेल्या चोराला कार वॉशिंग सेंटरवर नेत त्याची चांगलीच धुलाई केलीय. म्हशी चोरण्यात हातखंडा असलेला चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात चोरी करायचा. उदगीर आणि कर्नाटकातील काही भागात म्हशी चोरण्यात तो पटाईत होता. मागील वर्षभरात त्याने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच म्हशी चोरल्याची माहिती आहे. अशाच प्रकारच्या चोऱ्या तो कर्नाटकात ही करतो. मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहे मात्र तो सापडत नव्हता. लातूर जिल्हातील उदगीर हे कर्नाटकाच्या सीमारेषेवरील शहर आहे. या भागात अशोक नावाचा जनावरांची चोरी करणारा अट्टल चोर मागील अनेक वर्षापासून सक्रीय आहे. (Latur Crime news)
खबर मिळाली सापळा रचला...
उदगीर पोलिसांना अनेक शहरांमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी सापळा रचला.रेल्वे स्टेशन भागात तो दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक पोलीस कर्मचारी त्या भागात गेले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच अशोक त्या भागातील मोठ्या गटारीत उतरला. संपूर्ण शरीर गटाराच्या आत ठेवत चेहरा फक्त बाहेर ठेवून लपून बसला होता. मात्र पोलिसांनी त्याला अलगद गटारातून बाहेर काढलं. पोलिसाच्या अंगावर घाण टाकण्याचा तो प्रयत्न करत होता. सुटून जाण्यासाठी धडपडत होता मात्र पोलिसांनी पकड ढिली केली नाही.
गटारात माखला वाशिंग सेंटरवर धुतला...
अशोकच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यास कार वॉशिंग सेंटरवर आणले. पाण्याने अशोकला मनसोक्त आंघोळ घातली. चांगलीच धुलाई करत त्याला स्वच्छ केला आणि मग पोलीस स्टेशनकडे मोर्चा वळवला. हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशन भागात होत असल्यामुळे बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अशा "धूलाई" चा आनंद पोलीस आणि स्थानिक लोक घेत होते.अशोक याला अटक करून त्याने कुठे कुठे म्हशी चोरल्या आहेत याची माहिती उदगीर पोलीस घेत आहेत.
हेही वाचा: