लातूर: औसा तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांनी, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे दुर्घटना टळली.

मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन केले आहे. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत, तहसील परिसर दणाणून सोडलं.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांपैकी आठ जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन, आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखल्याने, अनुचित प्रकार घडला नाही.

आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला आहे. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी आंदोलकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

नारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन

लातूरच्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जो निर्णय घेण्यात येत आहे, तो चुकीचा आहे. त्यांना यातील कायदेशीर बाबी कळत नाहीत, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. राणेंच्या या वक्तव्याने संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आज हे सर्व कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथील मराठा भवन येथे जमले आणि त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन  केले.

संबंधित बातम्या 

बीडच्या अभिजीतने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं