Latur Letetst News : लातूर येथील तृतीयपंथीयांनी एकत्र येत बिकट परिस्थित असणाऱ्या कुटुंबाला मदत केली आहे. लातूर येथील माताजी नगरमध्ये रविवारी सर्वत्र हा कुतूहलाचा विषय ठरला. लातूर शहरातील काही तृतीयपंथींनी एकत्र येत एका मुलीचे कन्यादान केले आहे. त्यांनी लग्नाचा सर्व खर्च उचलत थाटामाटात लग्न लावून दिले. लातुरातील माताजीनगर परिसरात कावाले परिवार राहतो. त्यांची मुलीचं लग्न ठरलं. मात्र, परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्यांच्याकडे लग्नासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी लातूरमधील काही तृतीयपंथी धावून आले. तृतीयपंथी प्रिया लातूरकर यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे उभारले. लातूरमध्ये याची चर्चा होत आहे. 


कावाले कुटुंबातील पूजा हिचं लग्न ठरले होते. पूजाची आई मेसमध्ये पोळ्या करण्याचे काम करते तर वडिल हाताला मिळेल ते काम करतात. कसाबसा त्यांचा संसार चालतो. अशातच मुलीच्या लग्नाचा खर्च आला. त्यामुळे कुटुंबीय अडचणीत होते. याची माहिती त्याच भागात राहणाऱ्या तृतीयपंथी प्रिया लातूरकर यांना लक्षात आली.  या कुटुंबाला काहीतरी मदत करावी अशी भावना प्रिया लातूरकर यांच्या मनात आली. त्यानंतर ही गोष्ट त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली. त्यानंतर सर्व तृतीयपंथीयांनी एकत्र येत कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं.  मग तयारी सुरू झाली, लग्नासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी कऱण्यात आले. साड़ी, रुखवतचे सामान,दागीने, संसार उपयोगी साहित्य आणि बरेच काही सर्व काही त्यांनी पाहिले. 


रितसर पत्रिका वाटण्यात आल्या. प्रिया लातूरकर यांच्या घरासमोर हळदीचा जंगी कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी मंगल कार्यलयात लग्न विधि पार पडले. जवळपास पाचशे लोक या लग्नाला हजर होते.  प्रिया लातूरकर आणि त्यांचे सहकारी पालकच्या भूमिकेतुन काय हवे नको ते पहात होते. अतिशय सजून आलेल्या प्रिया आणि त्याचे सहकारी हे यावेळी चर्चेचा विषय होते. या कार्यामुळे आनंदी असल्याचे पुजाच्या आईने सांगितले आहे.


मला ज्यावेळेस त्या मुलीची परिस्थिती लक्षात आली तेव्हा मनातून वाटले की आपण त्यांच्या अडचणीत मदत करावी. मग बाकीचा विचार केला नाही. माझ्या काही सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. ते हीआनंदाने तयार झाले, असे प्रिया लातूरकर यांनी सांगितले.