बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार होत आहे. या रेल्वेमार्गाचं कामकाज सुरू झालेलं असताना या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेला स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं, असा ठराव बीड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या या ठरावाला सर्वांनीच पाठिंबा देत तो पारित करण्यात आला. अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. रेल्वे मार्गाचं काम प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील अहमदनगर ते नारायणडोह रेल्वेमार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे.

बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. या मार्गाला मंजुरी मिळाली आणि कामही सुरु झालं. मात्र त्यांच्या हयातीत हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी बीड जिल्ह्यातून जोर धरत होती. अखेर जिल्हा परिषदेने त्याला एकमताने मंजुरी दिली.

या रेल्वे मार्गाच्या नामकरणाची पहिली पायरी आता पार पडली आहे. यापुढे नामकरणाची पुढील प्रक्रिया होईल. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण करु, असं आश्वासन बीडमध्ये झालेल्या सभेत दिलं होतं.

संबंधित बातम्या :

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात!


अहमदनगर-बीड-परळी मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं!


अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पंतप्रधानांकडून आढावा