नागपूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवतीचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. गणपती महाप्रसादावेळी जागेवरुन दोन तरुणांचा वाद झाला होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मनिषा मसरामला बेदम मारहाण झाली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनिषाचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमधील राजावाडा परिसरातील असलेल्या बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाप्रसादाच्या जागेवरुन लोकेश मसराम आणि दर्शन वानखेडे या दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचं रुपांतर मारामारीत झालं. दोघांची मारामारी सुरु असताना लोकेशची बहिण मनिषा मसराम मध्ये पडली.
या मारहाणीवेळी तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.