धावत्या काकिनाडा एक्स्प्रेसमधून उतरताना एक तरुण आणि तरुणी प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. तरुण रेल्वेपासून लांब फेकला गेला तर तरुणी मात्र रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकली.
ही दृश्य पाहताना प्लॅटफॉर्मवर उपस्थितांनी क्षणभर डोळे मिटले. मात्र फलाटावरील एका पोलिसांनी चपळाई दाखवत त्या तरुणीला बाहेर खेचलं. अंगावर शहारा आणणारा तो प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलचं नाव पवन तायडे असून पोलीस नाईक राहुल मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाडही मदतीला धावून गेले.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर आली तेव्हा सकाळी साडेनऊच्या
सुमारास हा अपघात घडला.
दोन मिनिटांचा थांबा घेऊन रेल्वे मुंबईच्या दिशेने पुढे निघाली असता, एक वृद्ध व्यक्ती गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात फलाटावर पडली. तेव्हा फलाटावर उपस्थित काही प्रवाशांनी त्यांना बाजूला घेतलं आणि तिथं एकच गोंधळ उडाला. हे पाहून ड्युटी बजावत असलेल्या तायडे, मोरे आणि गाईकवाड यांनी तिकडे धाव घेतली.
तितक्यात त्याच धावत्या रेल्वेच्या दुसऱ्या बोगीतून एका तरुणाने आणि तरुणीने देखील उतरण्याचा प्रयत्न केला. तो तरुण रेल्वेपासून दूर फेकला गेला मात्र ती तरुणी त्याच रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडली.
यापूर्वीही अनेक वेळा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या किंवा उतरण्याच्या नादात काही प्रवाशांनी जीव गमावले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत. असे प्रकार न करण्याच्या वारंवार सूचना पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे.
पाहा व्हिडिओ :