पंढरपूर: पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात एका वृद्ध भाविक महिलेचा मृत्यू झाल्यानं मंदिर प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जातो आहे. उल्हासनगरमधील राजूबाई राजानी या आपल्या पतीसोबत विट्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. मात्र दर्शन रांगेतच चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या.

 

त्यांच्या पतीनं मंदिर प्रशासनाकडे मदतीची याचना केली. मात्र, कुणीही त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीनं केला आहे. यानंतर पतीनंच महिलेला रुग्णालयात नेलं. मात्र, त्याठिकाणी महिलेला मृत घोषित करण्यात आलं.

 

भगवानदास राजानी विठ्ठलाचे निस्सीम भक्त. पत्नी राजूबाई आणि मुलासह ते उल्हासनगरहून थेट पंढरीत पोहोचले. दर्शनाची रांग बघून भगवानदास कुटुंबासह मुखदर्शनासाठी आले. विठ्ठलाला डोळ्यात साठवून घेतलं आणि मंदिरात थोडा वेळ घालवावा म्हणून खाली बसले. पण तितक्यात भगवानदास यांच्या पत्नी राजूबाई कोसळल्या.

 

भगवानदास यांनी मदतीसाठी धावाधाव केली. पण काही फायदा झाला नाही. भगवानदास यांनी राजूबाईंना आपल्या खासगी गाडीनं दवाखान्यात नेलं, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

 

आषाढीची वारी तोंडावर आहे. पुढच्या महिन्याभरात 15 ते 20 लाख लोक विठूरायाच्या भेटीला येणार आहेत. पण त्याआधीच मंदिर प्रशासनाचा सावळा गोंधळ जगासमोर आला आहे. जर मंदिरात अँब्युलन्स, डॉक्टर उपलब्ध असते, तर आज राजूबाईंना जीव गमवावा लागला नसता.

 

मंदिर समितीच्या तिजोरीत वर्षाला कोट्यवधी रुपये पडतात. पण तरीही विठूरायाच्या लेकराची त्याच्या लेकरांची आबाळ होते आहे. ही बाब गंभीर आहे. त्याची पूर्ण जबाबदारी मंदिर समितीची आहे.