Ladki bahin yojana अकोला : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ गैरमार्गानेही देखील काहींनी मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेतील भाषणात बोलताना अजित पवारांनी देखील चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या साताऱ्यातील एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. आता, अकोला (Akola) जिल्ह्यातून 6 जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटा कागदपत्रे जमा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याबाबत, अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी माहिती दिली. तसेच, या घटनेतील 6 लाडक्या भावांवर कारवाई करत त्यांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलीय. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा 'लाडक्या भावां'नी केला आहे. या योजनेसाठी असलेल्या 'नारीशक्ती दूत' अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणारे आहे. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
अजित पवारांनी सांगितला होता किस्सा
अजित पवारांनी जन्मसन्मान यात्रेत बोलताना साताऱ्यातील किस्सा सांगितला होता. सातारा जिल्ह्यात एक पठ्ठ्या असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट, एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग करायला लावणार आहे.
हेही वाचा
शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं