बीडः मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाची दाहकता ही सरकारी फायलीतून मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर मंत्र्यांचे दुष्काळ दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यामध्ये सगळेच मंत्री दुष्काळी दौरा करताना पाहायला मिळत आहेत. पण हा दौरा म्हणजे केवळ सरकारी सोपस्कार आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. कारण राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी चक्क मोबाईल आणि टॉर्चने अंधारात पिकांची पाहणी केली. काल ते बीडच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. हा दौरा पूर्ण करताना अंधार पडल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी पिकांची पाहणी केली.

राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा तालुक्यात काल दुष्काळ दौरा होता. नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा येऊन त्यांनी रात्रीच्या अंधारात मोबाईल आणि टॉर्चच्या उजेडात नित्रुड येथील शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी केली. आज चंद्रपूर मध्ये होणाऱ्या नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी पाटलांना जायचे असल्याने ते पुढे निघून गेले.

मंत्री निलंगेकर दुपारी तीन वाजता नित्रुड येथील शेतात पाहणी करण्यासाठी येणार होते. नियोजित वेळेपेक्षा ते तब्बल चार तास उशिरा आल्याने अंधार पडला होता. गाडीच्या खाली उतरताच त्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेला. परंतु अंधारामुळे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच त्यांनी कापसाच्या पिकाची पाहणी करून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्रीमहोदयांना पाहणी दौऱ्यासाठी उशीर होत असल्याची कुणकुण प्रशासनाला होती म्हणूनच निलंगेकर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना संवाद साधणार होते, तिथे एक फोकस सुद्धा लावण्यात आला होता.

पाहा बातमीचा व्हिडीओ :