‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, भातशेतीचे मोठं नुकसान, कोकणात हाय अलर्ट
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2019 10:41 AM (IST)
परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर आता किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे कोकणात हाय अलर्ट जारी कण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : ‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आलं आहे. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतं आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील 24 तास असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किनरपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला. खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दुषित झालयं, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. पुढील दोन दिवस उधाणाचा धोका कायम असल्याने जामडूल बेटावरील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. मालवण, आचरा, देवगड भागाला समुद्राच्या उधाणाचा फटका. आचरा जामडूल पिरावाडीला उधाणाचा फटका जामडूल बेटाला पाण्याचा विळखा, खाडी किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. 'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्व नदी-नाले तुडूंब भरले आहेत. तिलारी धरणातही क्षमतेपेक्षा जास्त साठा झाला आहे. भेडशी येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. Kyaar Cyclone | तामिळनाडू, केरळमधल्या बोटी अडकल्या, 'क्यार' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका | ABP Majha दरम्यान गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.