सातारा : साताऱ्यातील पाचगणीत टेबललँडवरुन पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. पॅराग्लायडिंग करुन उतरताना झाडावर आदळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फांगा फेक ओ या पर्यटकाला अपघातात प्राण गमवावे लागले.

कोरियाहून आलेला पॅराग्लायडर्सचा ग्रुप गेल्या काही दिवसापासून वाई-महाबळेश्वर भागात मुक्कामी आहे. वाईतील स्थानिक मंडळी त्यांना मदत करत आहेत.

टेबललँडवरुन उड्डाण केल्यानंतर ते हळूहळू हवेच्या दिशेने आकाशात तरंगतात. प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही काल सायंकाळी काही जणांना पॅराग्लायडिंगला सुरुवात केली. मात्र या टीममधील फांग फेक ओ वगळता उर्वरित सर्व जण पुन्हा खाली उतरले. अंधार पडत चालल्यामुळे सर्व टीम आणि स्थानिकांनी फांग फेक ओचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पाचगणीच्या दरीजवळ असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर फांग फेक ओ मृतावस्थेत लटकताना आढळला. ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली उतरवून वाईच्या मिशन रुग्णालयात नेण्यात आला. अंदाज चुकल्यामुळे तो झाडावर आपटला असावा आणि जास्त मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांवर काही वर्षापूर्वी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. यातून वादही झाले होते, मात्र तरीही परवानगी नाकारण्यात आली होती. आता कोरियाच्या ग्रुपला कशी आणि कोणी परवानगी दिली, याबाबत वाई पोलिस तपास करत आहेत.