मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू. राज्यातील जनतेने प्रक्षोभ थांबवावा. याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच नराधमांना फाशीच मिळावी अशी मागणी कोर्टात करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

 

कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज विधीमंडळात चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं.

 

नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

 

कोपर्डी बलात्कार ही राज्याला काळीमा फासणारी घटना आहे. याबाबत सरकार गंभीर आहे. आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सरकार करेल. त्यासाठी उज्वल निकम यांच्यासारख्या निष्णात वकिलाची नियुक्ती कऱण्यात आली आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होऊन, भविष्यात अशाप्रकारचं कृत्य करण्याचं कोणाचंही धाडस होणार नाही, हा संदेश देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

पोलिसांची दिरंगाई नाही

याप्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप झाला. मात्र तो संपूर्णत चुकीचा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.  पोलिस 31 मिनिटात घटनास्थळी दाखल होते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

म्हणून मी जाऊ शकलो नाही

कोपर्डी बलात्कारानंतर मी नगरला जाऊ शकलो नाही, मात्र संपूर्ण माहिती घेत होतो. घटना झाली त्यावेळी मी रशियाला  होतो, त्यानंतर पंढरपूर आणि दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या बैेठकीला होतो. त्यामुळे मला नगरला जाता आलं नाही. पण माझं संपूर्ण लक्ष त्या घटनेकडे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

 

..तर सीआयडीमार्फत चौकशी

पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना पीडित कुटुंबाला भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करण्याची तयारी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

अवैध दारु व्यवसायाला 10 वर्षांची शिक्षा

कोपर्डी बलात्कारानंतर अजित पवार यांनी अवैध दारु व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अवैध दारु व्यवसायाप्रकरणाची शिक्षा तीनवरुन दहा वर्षांपर्यंत वाढवणार. तसंच  ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हद्दीत अवैध दारु सापडेल, त्या अधिकाऱ्यावरही कारवाई करु.