अहमदनगर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.
आता येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सकाळी 11 च्या सुमारास न्यायालयात दाखल झाले. याशिवाय तीनही आरोपीही कोर्टात हजर होते.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तिन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालय आज कोणती शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान न्यायालयात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत.
जन्मठेप की फाशी
दरम्यान, आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते.
कलम 120 ए, 376 (बलात्कारा) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत.
कोर्टात काय झालं?
कोर्टात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभं केलं. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचं वय विचारलं. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले.
तिघांवर बलत्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर तिघांवरील दोष सिद्ध करण्यात आले.
कलम 120 ए, 376 (बलात्कारा) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत.
सुट्टीच्या दिवशीही युक्तिवाद
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला. जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचं कामकाज पार पडलं. तीन दिवसीय युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला.
यावेळी 24 परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. घटनेपूर्वी दोन दिवस आधी तिघांनी छेडून काम दाखवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पिडीतेवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. त्याचबरोबर बचाव पक्षाच्या साक्षीदाराचे व्हिडीओ सीडी बनावट असल्याचा युक्तिवाद केला. तर आरोपींच्या वकिलांनी पंचनाम्यातील त्रुटी, साक्षीदारांचा विसंगतपणा, पुरावे आणि नकाशावर आक्षेप घेतला. अंतिम युक्तिवादाचा ऑडिओ रेकॉर्डिंग ही करण्यात आलं आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त
दरम्यान कोपर्डीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकार्यांसह तब्बल 500 पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वेळप्रसंगी एक हजार पोलिस तैनात करण्याचं नियोजन आहे. त्याचबरोबर शिघ्र कृती दल, एफआरपीसह अनेक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोर्टाच्या परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. तसंच सीसीटीव्ही कॅमेर्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
या संदर्भात पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. न्यायालयात फक्त न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांना कडक तपासणी करुनच सोडण्यात येणार आहे. तर न्यायालयीन कक्षात केवळ खटल्याशी संलग्न असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
31 जणांच्या साक्ष
कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
राज्यभरात मराठा मूक मोर्चे
कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले.
कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम...
13 जुलै 2016 -
रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या
15 जुलै 2016 -
जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक
16 जुलै 2016 -
संतोष भवाळला अटक
17 जुलै 2016 -
तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत
18 जुलै 2016 -
दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला
24 जुलै 2016 -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट
7 ऑक्टोबर 2016 -
तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यालयात दोषारोपपत्र दाखल
1 एप्रिल 2017 -
कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला
22 जून 2017 -
खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले
2 जुलै 2017 -
कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय
12 जुलै 2017 -
कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च
13 जुलै 2017 -
घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण
9 ऑक्टोबर -
खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण
संबंधित बातम्या
कोपर्डी प्रकरणी आजपासून सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद
कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण
कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक
LIVE कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2017 08:08 AM (IST)
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -