रत्नागिरी : कोकणात रिफायनरीच्या मुद्यावरुन आता राजकीय पडसाद उमटत आहेत. कारण, रिफायनरीची चर्चा सुरु असलेल्या राजापूर तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये थेट रिफायनरीविरोधी पॅनल उभे केले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशाप्रकारे उतरण्याचा निर्णय मुंबई इथे रविवारी (17 एप्रिल) झालेल्या सभेत घेण्यात आला. मुख्य बाब म्हणजे रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना गावात प्रवेश देखील न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. शिवाय, रिफायनरी विरोध आता तालुक्यात देखील नेण्याबाबतचा निर्णय झाला आहे.
मुंबई आणि गावचे मिळून जवळपास 200 च्या संख्येने नागरिक या सभेत सहभागी झाले होती. मुख्य बाब म्हणजे धोपेश्वर गावाच्या ग्रामपंचायतीत रिफायनरीविरोधात झालेल्या ठरावानंतरची ही एक मोठी घडामोड आहे. याच भागात शिवसेनेचं राजकीय प्राबल्य असून बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी यापूर्वी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता थेट रिफायनरी विरोधकांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रिफायनरीच्या मुद्यावरुन कोकणात शिवसेनेची डोकेदु:खी मात्र वाढली आहे.
मुंबईतील सांताक्रूझ इथे पार पडलेल्या या बैठकीत पंचक्रोशीतील ग्रामीण आणि मुंबई समितीचे पदाधिकारी, सदस्य, गावकर, गावप्रमुख, वाडीप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे...
1. रिफायनरी विरोधी पॅनलची अधिकृत घोषणा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढवून जिंकणारच
2. वाडी-वाडीत रिफायनरीविरोधी पॅनलचे बोर्ड लावणार
3. परिसरातील गावांचे संपर्क अभियान
4. महिला संघटन करणे आणि मे महिन्यात मोठा महिला मेळावा
5. सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे लिखित राजीनामे
6. सर्वच राजकीय पक्षांचे रिफायनरी समर्थक पदाधिकारी, आमदार, खासदार यांना रिफायनरी रद्द होईपर्यंत गावात प्रवेश नाही
7. आतापर्यंत मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, राज्यपाल आदींना भेटीसाठी दिलेल्या पत्राबद्दल फॉलोअप
राजापूरमध्ये प्रकल्प प्रस्तावित
राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानुसार, रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
Kokan Refinery Project : एकच जिद्द, रिफायनरी रद्द! राजापूरमध्ये प्रस्तावित प्रकल्पाविरोधात मोर्चा