Konkan Refinery Project : कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, नाणार रिफायनरी विरोधी संघटना बारसु-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नाणार आणि आसपासच्या 14 गावांमधील लोकं बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे समर्थन करणार आहेत.
यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबई इथे संघटनेची बैठक झाली आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नाणार आणि आसपासच्या जवळपास 14 गावांमधील लोक हे सध्या सुरु असलेल्या रिफायणरी विरोधी आंदोलनाला साथ देणार आहेत. त्यासाठी आता थेट आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी मुंबईतून देखील लोक या रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात.
रिफायनरी प्रकल्पांबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मागील काही महिन्यात राज्यातून काही मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता राज्य सरकार कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकार पुढील आठवड्यात या प्रकल्पाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे रिफायनरी विरोधकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडीपार का करू नये अशी विचारणा या नेत्यांना करण्यात आली आहे. कोकणातील रिफायनरीविरोधातील आंदोलन मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. याच आंदोलकांच्या नेत्यांना आता तडीपारी का केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस उपविभागीय पोलिस कार्यालयानं पाठवली आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव इथं रिफायनरीसाठी चाचपणी केली जात आहे. त्यामुळं नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे.