Konkan Rain News : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) कोसळत आहे, तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ देखील झाली आहे. दरम्यान, अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवेत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, हवेत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस उसंत गेलेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात जोर धरला आहे. गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर जिल्ह्यात रिमझिम पाऊस कोसळत आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीस उपयुक्त पाऊस असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे.
बीडसह जालन्यात महिनाभरापासून पावसाचा खंड
बीड मधील परळी, अंबाजोगाई माजलगाव तालुक्यात महिनाभरापासून पावसाची प्रतिक्षा होती काल रात्री पासून या तालुक्यात पाऊस पडलाय तर अद्यापही केज,धारूर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे या तालुक्यात साधारण महिनाभरापासून पाऊस झाला नाही. जालना जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाचा खंड पडला असून सर्वदूर पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कधी भुरभुर वगळता पाऊस पूर्ण गडप झालाय, दररोज ढगाळ वातावरण आहे ,मात्र पावसाचा पत्ता नाही, ही स्थिती पुढील आणखी काही दिवस राहिली तर पेरणी वाया जाऊ शकते .
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर काही ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हलक्या पावसचा इशारा आहे. 18 जुलै रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्हयाला यलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकणात मात्र, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: