Nagpur : नागपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच महिला जखमी झाल्या आहेत. रामटेक तालुक्यातील मौजा सोनेघाट इथं ही घटना घडली आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही वीज पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतात 25 महिला काम करत होत्या. दुपारची जेवणाची सुट्टी करताना वीज कोसळल्याची घटना घडली आहे. मंगलाबाई मोटघरे वय 40 वर्ष रा. शितलवाडी परसोडा ता. रामटेक वर्षा देवचंद हिंगे वय 33 वर्षे रा. भोजापुर अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून दोन सख्या भावांचा मृत्यू
गेल्या महिन्यात सिल्लोड तालुक्यातील सारोळा गै. गावात शेतात पेरणी करत असताना वीज पडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मृतांची नावे रोहित काकडे (वय 20) आणि यश काकडे (वय 17) अशी आहेत. ही दोघं भाऊ आपल्या आईसोबत शेतात पेरणीच्या कामात व्यस्त होते. अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार विजांचा कडकडाट सुरू झाला. याच वेळी वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली, आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना मोढा बू. (ता. सिल्लोड) परिसरात घडली. येथे रंजना बापुराव शिंदे (वय 50) या महिला आपल्या गट क्रमांक 266 मधील शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.तिसरी घटना मौजे पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथे घडली. येथेही वीज पडून शिवाजी सतीश गव्हाणे या युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे गंभीर जखमी झाला होता.
राज्याच्या विविध भागात वीज कोसळल्याच्या घटना
राज्याच्या काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागात मुळसधार पाऊस झाला. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात वीज कोसळ्याच्या घटना घडतात. यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होतो. कधी हे संकट लोकांवर येते तर कधी जनावरांचा देखील यामुळं मृत्यू होतो. यावर्षी देखील राज्याच्या विविध भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत मराठवाडा आणि विदर्भात वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ह्रदयद्रावक... दोन सख्या भावांचा जागेवर जीव गेला; छत्रपती संभाजीनगरात वीज पडून 4 जणांचा मृत्यू