Konkan Railway : भारतीय रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. मागील सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होते. या विद्युतीकरणामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास देखील प्रदूषणमुक्त होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने 2016 रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचा लोकापर्ण सोहळा पार पडणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमाला पंतप्रधान ऑनलाइन हजेरी लावणार आहेत. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, उडपी आणि मडगांव रेल्वे स्थानकांवर लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जोरदार तयारी करण्यात आली आहे.
इंधन बचत आणि प्रदूषण मुक्त प्रवास
कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे 12 डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता, विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून 22 आणि 24 मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली झाली होती. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर आता कोकण रेल्वे विजेवर धावण्यास सज्ज झाली आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग हा आव्हानात्मक आहे. त्यातच कोविड -19 महासाथीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक झाले होते. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व विद्युतीकरणाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.