कोल्हापुरात नदीशेजारी असलेल्या भागात प्रचंड बांधकाम सुरु झालं आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पण पूररेषा डावलून हे बांधकाम केलं जातंय. या अनधिकृत बांधकामांवर कुणाचाही वचक नाही, उलट राज्यकर्त्यांचं अशा बांधकामांना अभय मिळतंय असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
कसबा बावडा असो किंवा नदीकाठचा कोणताही परिसर, प्रत्येक ठिकाणी रेडझोनमध्ये बांधकामं सुरु झाली आहेत. इतकंच नाही, तर त्याच बांधकामांचा राडारोडा हा नदी आणि नाल्यात टाकला जातोय. त्यामुळे पंचगंगेचं पाणी थेट जयंती नाल्याद्वारे कोल्हापूरच्या मुख्य चौकांमध्ये दाखल होत आहे. रेड झोनमधल्या बांधकामांना वेळीच आवर घातला नाही, तर कोल्हापूरच्या पंचगंगेचा रुद्रावतार वर्षागणिक वाढत जाण्याची शक्यता आहे.
तब्बल 130 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरडा पडलेला कोल्हापूरचा कळंबा तलाव यंदा पाच दिवसाच्या मुसळधार पावसानं ओसंडून वाहत आहे. कधीही न पाहिलेला कळंबा तलावाचा तळ यंदा कोल्हापूरकरांनी पाहिला होता, मात्र आता पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत वाढली आणि पाणी तलावाच्या बाहेर पडलं.
कात्यायनी डोंगरातून वाहणारे ओढे कळंबा तलावात मिसळत गेले आणि तलावाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली. यंदा जलयुक्त शिवार योजनेतून तलावातील 1 लाख 65 हजार घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झालीय. कळंबा तलावाचं हे नयनरम्य दृश्यं पाहण्यासाठी कोल्हापूरांनी हजेरी लावली.