कोल्हापूर : कोल्हापुरातील गजबजलेल्या ताराबाई रस्त्यावरच्या एका सराफ दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 28 लाखांचा ऐवज लुटल्याची माहिती आहे. या चोरीचं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलं आहे.
15 लाखांचं सोनं आणि 13 लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचं सांगितलं जातं. चोरट्यांनी तोंडावर मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालून चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. तटाकडच्या तालीम चौकात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. सीसीटीव्हीच्या निरीक्षणानंतर चोरट्यांनी रेकी करुन अतिशय नियोजनबद्द ही चोरी केल्याचं स्पष्ट होत आहे.
कशी घडली चोरी?
सीसीटीव्हीमध्ये रात्री साडेनऊ वाजल्यापासून ताराबाई रोडवरुन मास्क घातलेले 20 ते 25 वयाचे दोन चोरटे दुकानाजवळ फिरताना दिसत आहेत. 9.40 वाजता चोरट्यांनी शोरुमकडून जाणारा रस्त्यावरचा दरवाजा उघडला. त्यानंतर पहिल्या खोलीतील दरवाजाचे कुलूप तोडून खिशात घातले.
पहिल्या मजल्यावर शोरुमची काच फोडून ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने खिशात घातले. ड्रॉवरमध्ये किल्ल्यांचा जुडगा त्यांना सापडला. शोरुममधून शेजारील ऑफिसमध्ये प्रवेश केला. तिथली तिन्ही कपाटं त्यांनी उघडली. सोन्याचे दागिने, नोटांची बंडलं त्यांनी पिशवीत घातली. एक सीसीटीव्हीही फोडला, तर दुसरा वाकवला. चोरी करुन दुकानाच्या मागील दाराने ते पळून गेले.