कोल्हापूर: लग्‍नाचे आमिष दाखवून कोल्हापुरातील एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर, कर्नाटकातील डॉक्टरने दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.


हा आरोपी गुलबर्गा येथील रहिवासी आहे. पीडित युवतीने कोल्हापुरातील करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.

33 वर्षीय महिलेने क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या महिला खेळाडूची डिसेंबर 2016 मध्ये सोशल मीडियावर गुलबर्गा इथल्या डॉक्टरशी ओळख झाली.

त्यांच्यात मैत्री वाढली. त्यानंतर डॉक्टर स्वत: कोल्हापुरात आला. युवतीची भेट घेऊन तिच्यासमोर लग्‍नाचा प्रस्ताव ठेवला. मुलगा डॉक्टर आहे म्हणून या युवतीने होकार दर्शविला. डिसेंबर 2016 ते 2 मार्च 2018 या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरने  युवतीला गोवा आणि बंगळुरु इथं नेऊन बळजबरी करीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला.

काही दिवसांपूर्वी पीडित युवतीने लग्‍नासाठी त्याच्याकडे सातत्याने विचारणा केली. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला. दोघांत अनेकदा जोरात वादावादीही झाली. युवतीने पिच्छा सोडावा, यासाठी त्याने मानसिक छळ करुन सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली.  शिवाय घटनेची वाच्यता केलीस, तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे युवतीने सांगितले आहे.

युवतीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तीने डॉक्टरविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. भारतीय दंडविधान संहिता 376, 505 अन्वये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी  सांगितले.

या घटनेची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर पोलिसांचे पथक कर्नाटकात आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास योग्य गतीने होत नसल्याचे आरोप, पीडित खेळाडू युवतीने केला आहे.

या प्रकरणात संशयित आरोपीला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांची मदत घेतली आहे.