कोल्हापूर : मातीतल्या कुस्तीचा राज्यभर प्रचार व्हावा म्हणून कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. या गाडीतून बालाने देश, राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्तीचे धडे मल्लांना द्यावे, अशी अपेक्षा सचिन सापळे यांनी व्यक्त केली आहे.


कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून जगभर ओळखलं जातं. याच कुस्तीच्या पंढरीतून अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असे मल्ल तयार झाले. यास मल्लांना हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यासह अनेक दिग्गज उस्तादांचा मार्गदर्शन लाभलं. हीच मातीतली कुस्ती राज्यभर नव्हे तर देशभर जावी असा सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांचा उद्देश आहे.

बुलडाण्याचा बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

सचिन सापळे यांनी आजवर पश्चिम महाराष्ट्रातील 12 मल्लांचं पालकत्व स्वीकारलं असून अनेक अनाथ मुलं त्यांनी दत्तक घेतली आहेत. तसंच अनेक शाळा डिजिटल केल्या आहेत. असा सामाजिक वारसा असलेले कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. या गाडीतून बालाने देश  राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्ती चे धडे मल्लांना द्यावे अशी अपेक्षा सचिन सापळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच बालाने हिंद केसरी आणि महाभारत केसरी स्पर्धा जिंकावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचं कुस्ती प्रशिक्षण कोल्हापुरात झालं. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाला केसरीने आपले कुस्तीचे धडे गिरवले. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बालाची कोल्हापूरची असलेली नाळ आजही अतूट आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी आपल्याला दिलेली स्कॉर्पिओ कार म्हणजे कुस्तीचा फार मोठा मान आहे. म्हणूनच ही नवी गाडी घेऊन देशातील प्रत्येक गावात मातीतली कुस्ती टिकावी आणि वाढावी म्हणून मी प्रयत्न करेन, असं बालाने म्हटलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने केवळ कुस्तीचा प्रचार व्हावा आणि महाराष्ट्रातील पैलवानांना सन्मान मिळावा यासाठी हे कार्य सुरु केलं आहे. या कार्याचं कोल्हापुरात कौतुक होत आहे.