कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपराच यंदा मोडित काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करवीर निवासिनीला नवरात्रात तिरुपती बालाजी देवस्थानाकडून आलेला शालू नेसवण्याची परंपरा गेल्या 20 वर्षांपासून सुरु होती. मात्र कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरुपतीहून शालू येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
अंबाबाईला महालक्ष्मी करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप पुजाऱ्यांवर करण्यात येत आहे. महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून तिला दरवर्षी मानाचा शालू तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडून येत होता. मात्र अंबाबाईचं महालक्ष्मीकरण थांबवण्यासाठी भक्तांनी ही प्रथा मोडण्याचं ठरवलं आहे.
कोल्हापुरी साज, चंद्रहार, मोहनमाळ, वाळे, कुंडले, अंबाबाईचे दाग-दागिने
यापूर्वी तिरुपती देवस्थानाला पत्र लिहून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नवरात्रौत्सवात शालू पाठवण्याची मागणी करत होतं. यावेळी मात्र देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानाशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.
नवरात्र उत्सवासाठी यंदा भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून पालखी तयार करण्यात आली आहे. तसंच देवीच्या पूजेवरुन पुन्हा कोणताही वाद होऊ नये यासाठी देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शास्त्रानुसारच देवीची पूजा बांधण्यात येणार असून नऊ दिवस मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.