कोल्हापूर: कोल्हापूर हे कलापूर आहे आणि वेळोवेळी त्याची प्रचिती येते. कोल्हापूरच्या एका तरुण छायाचित्रकाराने जागतिक पातळीवर आपलं नाव कोरलं आहे. प्रज्वल चौगुले असं या तरुणाचं नाव असून अॅपल कंपनीने घेतलेल्या स्पर्धेमध्ये जगातील पहिल्या 10 फोटोग्राफरच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. त्याने काढलेल्या कोष्ट्याच्या जाळीचा फोटोमुळे त्याला ही नवी ओळख मिळाली आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सकाळी फिरायला गेल्यानंतर एका कोष्ट्याची जाळी प्रज्वलच्या निदर्शनास आली. ही जाळी दव बिंदूच्या रुपात होती आणि तीच प्रज्वलने आपल्या कॅमेरात टिपली. प्रज्ज्वलचा हा फोटो डिसेंबर 2021 मध्ये शिवाजी विद्यापीठातील संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या मागे असलेल्या तळ्याजवळील आहे. आता त्याच फोटोला अॅपलच्या सुंदर फोटोंच्या यादीत स्थान मिळालं आहे. या फोटोमुळे प्रज्वलचा जगातील पहिल्या 10 फोटोग्राफरच्या यादीत समावेश झाला आहे.
प्रज्वल चौगुलेचे या आधीही अनेक फोटो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जीवनशैलीला प्रज्वलने आपल्या कॅमेरात टिपलं असून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहेत. प्रज्वल हा इंजिनिअर असून नोकरीही करतो. नोकरीसोबत प्रज्वलने फोटोग्राफीचा छंदही जोपासला आहे.
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने अॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज या स्पर्धेसाठी जगभरातून फोटो मागितले होते. यासाठी आयफोन 13 प्रो किंवा आयफोन 13 प्रो मॅक्स या मोबाईलचा वापर करुन छायाचित्रं काढण्याची अट घातली होती. प्रज्वलने यासाठी दवबिंदूमधील कोष्ट्याच्या जाळ्याचा फोटो पाठवला होता. त्याच्या याच फोटोची निवड टॉप टेन फोटोमध्ये झाली आहे. कंपनीने प्रज्ज्वलचं छायाचित्र अॅपल डॉट कॉम या वेबसाईटसह कंपनीच्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलं आहे.
प्रज्वलचे या आधीची छायाचित्रं नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, बीबीसी अर्थ, सीएनएन क्रिएट, कॅनॉन, एशियन फोटोग्राफी मॅगेझिन अशा नामांकित संस्थांच्या वेबसाईटवर झळकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- सदावर्तेंच्या प्रॉपर्टीचं घबाड; घरात नोटा मोजण्याचं मशीन, केरळवरून भारदस्त कार घेतल्याचा सरकारी वकिलांचा दावा
- एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांची नावं वगळून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; सूत्रांची माहिती
- अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट; ताबा कोल्हापूर पोलिसांना मिळणार की नाही याचा उद्या फैसला