नागपूर : इमामवाडा पोलीस स्टेशनच्या मागे असलेला रामबाग वस्ती परिसर अवैध दारुविक्रीसाठी कुप्रसिद्ध आहे. मंगळवारी संध्याकाळी याच वस्तीत दिनेश शर्माची भोसकून हत्या झाली.

या प्रकरणी अवैध दारु विक्री करणाऱ्या अक्षय मेश्रामला अटकही झाली. पण त्याआधी दिवसभर दिनेश शर्मानं वस्तीला जीव नकोसा केला होता. चाकूनं धमकावलं होतं, हल्ला केला होता. पोलिसात तक्रार करुनही कारवाई झाली नाही आणि काल संध्याकाळी दिनेशची हत्या झाली.

रामबाग वस्तीत उघडपणे अवैध दारुगुत्ते चालतात. पोलिसांना सगळं माहिती असूनही कारवाई होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. पोलीस स्टेशनच्या उंबऱ्यावर गुन्हे घडण्याची ही पहिली घटना नाही..

26 सप्टेंबरला सक्करदरा पोलीस स्टेशनच्या समोरील घरात शशिकला ठाकरे या वृद्ध महिलेची लुटारुंनी हत्या केली. 28 तारखेला जरीपटका पोलीस स्टेशनपासून 400 मीटर अंतरावर मणप्पुरम गोल्डवर 9 कोटी 33 लाखांचा दरोडा पडला. 29 सप्टेंबरला गोकुळपेठच्या बाजारात गुंडांच्या टोळीने भरदिवसा दहा गोळ्या घालून प्रतिस्पर्धी टोळीच्या गुन्हेगाराची हत्या केली.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचं गुन्हेगारीपूर झालं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. या आरोपांना कुणी गांभीर्यानं घेतंय का? हा प्रश्न कायम आहे.