कोल्हापूर : कोल्हापुरात अपहरण झालेल्या तिसरीतील चिमुरड्याची हत्या झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रंकाळा तलावातील पतौडी खाणीतल्या पाण्यात प्रदीप सुतारचा मृतदेह सापडला.


कोल्हापुरातील कळे पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्येची घटना उघडकीस आली. तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्या प्रदीपचं अपहरण करण्यात आलं होतं. मात्र अपहरणकर्त्यांनी त्याचा जीव घेतल्याचंही स्पष्ट झालं आहे.

प्रदीपच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र खुनाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

पन्हाळा तालुक्यातील मरळी इथे सरदार तुकाराम सुतार हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचं गावातच वेल्डिंग शॉप आहे. प्रदीप हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

सरदार सुतार यांचा साळवन इथला नातेवाईक विश्वास लोहार हा नेहमी सरदार सुतार यांच्याकडे राहण्यासाठी यायचा. सोमवारी दुपारी प्रदीपला दुकानात घेऊन जातो, असं सांगून तो त्याला घेऊन गेला. मात्र उशिरापर्यंत ते दोघेही परत आले नाहीत.

संध्याकाळी सरदार सुतार आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रदीपचा गावात शोध सुरु केला, परंतु तो सापडला नाही. काही लोकांना प्रदीपला रंकाळा बसस्थानक परिसरात पाहिल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात संशयित नातेवाईक आणि त्याचा मित्र अशा दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी विश्वास लोहारकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या अन्य एका मित्रासह प्रदीपला घेऊन रविवारी दिवसभर शहरात फिरल्याची कबुली दिली. मात्र त्याला कुठे सोडलं किवा त्याचा घातपात केला का? याबाबत दोघांनीही मौन बाळगलं होतं.