कोल्हापूर : अंगावर काटा उभा राहिल असा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडला आहे. अवघ्या सात महिन्याच्या बाळासह साडीने गळफास घेऊन एका परप्रांतीय महिलेनं आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल औद्योगिक वसाहतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संभारी मरंडी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.


घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मीधर मरंडी हा मूळचा ओडिशाचा आहे. मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील सूतगिरणीत तो कामाला आहे. याच मिलच्या शेजारी कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी लक्ष्मीधर आपली पत्नी संभारी आणि मुलगा भगवान याच्यासह राहत होता...मंगळवारी रात्री अकरा वाजता रात्रपाळी असल्यानं लक्ष्मीधर कामाला गेला होता.


रात्रपाळी संपवून दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी लक्ष्मीधर कामावरुन आला. पत्नी संभारी हिला खाक मारुन दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. पण बराच वेळ हाक मारुन देखील घरातून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळं शेजारी असलेल्या कामगारांच्या मदतीनं लक्ष्मीधर यानं घराचा दरवाजा उघडला. मात्र त्यानंतर भयानक दृश्य निदर्शनास आलं. पत्नी संभारी हिनं साडीच्या सहाय्यानं गळफास लावून घेतला होता. आणि सोबत सात महिन्याचा बाळाच्या गळ्याला देखील साडीनं गुंडालेलं होतं. तत्काळ या घटनेची माहिती कागल पोलीस ठाण्यात देण्यात आली. 


संभारी मरंडी हिनं सात महिन्याच्या बाळासह आत्महत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.