कोल्हापूर : सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती अद्यापही कायम असून पाण्याची पातळी संथ गतीने कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर आहे. काल रात्री 1 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 51.2 इंच इतकी होती.

कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यामुळे करवीर, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमने गेल्या काही दिवसांपासून मदत कार्य राबवत आहे. मात्र चंदगड, आजरा, गारगोटी या परिसरात मदत कार्य पोहोचायला वेळ झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आजपासून चंदगड, आजरा या भागासाठी मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. चार बोटी आणि 34 जवान या परिसरातून आजरा , चंदगड परिसरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.

कोल्हापूरला जाणारे मार्ग आजही बंदच

गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळ कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या जिल्ह्याला महापुराचे स्वरूप आलेला आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणारे सर्वच रस्ते गेल्या आठ दिवसांपासून बंद झालेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी देखील अनेक रस्त्यांवर, पुलावर पूराचे पाणी असल्याने कोल्हापूरला जाणारे मार्ग आजही बंदच आहेत. मुंबई-पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी असलेल्या महामार्गावर अद्यापही चार फूट पेक्षा अधिक पाणी आहे. बेळगावहून कोल्हापूरला येणाऱ्या मार्गावर निपाणी परिसरात पाणी असल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या मार्गावरून कोल्हापुरात येता येत होतं, मात्र आंबेवाडी पासून रजपुतवाडी पर्यंत या मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्गही पूर्णपणे बंद आहे. सिंधुदुर्गातून गगनबावडामार्गे कोल्हापूरला जाण्याच्या मार्गावरही अनेक खेड्यांमध्ये पाणी असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. फोंडा-राधानगरी मार्गे कोल्हापूरला येण्याचा मार्ग होता, मात्र या मार्गावर सुद्धा अनेक गावांमध्ये पाणी आल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. तसेच सांगलीहून कोल्हापूरला येण्याच्या मार्गावरदेखील शिरोली नाका परिसरात पाणी असल्यामुळे हा रस्ता बंद आहे.

त्यामुळे कोल्हापूरला जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरचा इतर विभागाशी पूर्ण संपर्क तुटलेला आहे. सध्या पुराचं पाणी ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय कोल्हापूरकरांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

पन्हाळाकडे जाणारा रस्ता खचला, रस्त्याला मोठे तडे गेल्याने वाहतूक ठप्प