कोल्हापूर: द स्ट्रेलेमा, पुणे या संस्थेने केलेल्या 'मतदानोत्तर सर्वेक्षणातून' कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस 9 टक्के मताधिक्याने राखेल, महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विजयी होतील असा अंदाज वर्तवलेला होता. तो आता खरा ठरला असून जयश्री जाधव यांनी 18,901 मतांनी विजय मिळवला आहे.
पुण्यातील संस्था असलेल्या 'द स्ट्रेलेमा'ने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीविषयी अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये काँग्रेसला 91,923 मतं मिळतील तर भाजपला 74,651 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली होती. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या 17,272 इतक्या मतांनी निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज आता जवळपास खरा ठरला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 18,901 इतके मताधिक्य मिळालं आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 96,226 इतकी मतं मिळाली आहेत तर भाजपला 77,426 इतकी मतं मिळाली आहेत.
महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेवेळेस ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला मिळाली होती. काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली गेली होती.
निवडणुकीतील आकडेवारी
- एकूण मतदान : 291798
- मतदानाची टक्केवारी : 60.09 टक्के
- एकूण झालेले मतदान : 175341
- जयश्री जाधव- 96,226
- सत्यजित कदम- 77,426
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा,
- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले.
- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला.
- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले.
- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते.
- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते.
संबंधित बातम्या:
- Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? कोल्हापुरातील पराभव भाजपच्या जिव्हारी
- Kolhapur By Election Exit Poll : 'काँग्रेस'च 'कोल्हापूर उत्तर' राखण्याची शक्यता, 'द स्ट्रेलेमा'चा अंदाज