कोल्हापूर : कोल्हापुरात कुमारी आणि अल्पवयीन मातांची बेकायदेशीर प्रसुती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इचलकरंजीतील जवाहरनगरमध्ये असलेल्या डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकाने धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला.


या हॉस्पिटलमध्ये देशातील विविध भागात मुलींची लाखो रुपयांना विक्री झाल्याचं समोर आल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. अरुण पाटील यांना अटक केली आहे.

डॉ. अरुण पाटील.... परिसरातील नागरिकांना स्वस्तात रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्याचं नाटक करणाऱ्या या महाभागाचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये कुमारी माता, अल्पवयीन माता अशा अडचणीत आलेल्या महिलांची प्रसुती करण्याचा उद्योग डॉ. अरुण पाटील यांनी चालवला होता.

अडचणीत असणाऱ्या माता एजंट मार्फत आणायच्या, त्यांची बेकायदेशीर प्रसुती करायची हा त्याचा धंदा.. प्रसुत झाल्यानंतर त्या मातेला भरघोस रक्कम द्यायची आणि त्या मुलांचं संगोपन करायचं. वेळ मिळताच त्या मुलींची राज्याबाहेर विक्री करायची.

या प्रकरणाची माहिती नवी दिल्लीच्या केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल कल्याण समिती सदस्यांनी डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर धाड टाकली. यावेळी या दवाखान्यात नुकतीच प्रसुती झालेली माताही होती.

या कुमारी मातेकडून 2 लाख रुपयांना मुलगी घेतल्याचं त्या मातेने या पथकाला सांगितलं. पथकासोबत आलेल्या पोलिसांनी डॉ. अरुण पाटील यांना ताब्यात घेतलं. तसंच हॉस्पिटलमधील कागदपत्रे आणि संशयित वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

डॉ . अरुण पाटील यांनी मुंबई, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या परिसरात लहान मुले विकल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही जण सामील असण्याची शक्यता आहे. या संदर्भातील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.