कोल्हापूर : खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातांनी लिहिलेली पत्रं, छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांचे आदेश, याशिवाय तब्बल सव्वा कोटी दुर्मिळ कागदपत्रं.. कोल्हापूरच्या पुराभिलेखागरातला हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा अजरामर होत आहे.
लवकरच आपल्या सर्वांना ही ऐतिहासिक कागदपत्रं घरबसल्या अभ्यासता येणार आहेत. या ऐतिहासिक कागदपत्रांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील संस्थान काळात खास कागदपत्रं ठेवण्यासाठीच टाऊन हॉलसमोर रेकॉर्ड रुम बांधण्यात आली. काळ्या घडीव दगडांमध्ये बांधलेल्या या इमारतीमध्ये पुराभिलेखागार कार्यालयाकडून पुरातन आणि ऐतिहासिक कागदपत्रांचं जतन करण्यात येतं.
कागदपत्रांवर वाळवी आणि इतर कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पंधरा दिवसांतून एकदा पेस्ट कंट्रोलिंगही केलं जातं. मात्र इतिहासाचा दुर्मिळ साठा कायमस्वरुपी जतन करण्यासाठी हे प्रयत्न तोकडे आहेत.
म्हणूनच या कागदपत्रांचं स्कॅनिंग करण्यात येत आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालतो तो इतिहास. हा इतिहास त्या-त्या काळातल्या कागदपत्रांमध्ये दडलेला असतो. त्यामुळे इतिहास संवर्धनासाठी कागदपत्रांच्या डिजिटायशेनचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.