Nagpur News : देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. 130 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे प्रवाशांना विमान प्रवासासारखा प्रवास करण्याचा अनुभव मिळणार आहे. 


सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Nagpur to Bilaspur Vande Bharat Express) भाडे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत हे भाडे 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जास्त भाडे असूनही प्रवाशांमध्ये या ट्रेनबद्दल खूप उत्सुकता आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या अंतर्गत ही ट्रेन धावणार आहे. ही गाडी सकाळी बिलासपूरहून सुटणार असल्याने प्रवाशांना फक्त चहा आणि नाश्ता मिळेल, तर नागपूरहून सुटणाऱ्या प्रवाशांना दुपारचे जेवण दिलं जाणार आहे. त्यामुळे नागपूरहून सुटणाऱ्या प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. 


नागपूर ते बिलासपूर अंतर 413 किमी आहे. चेअर कारचे तिकीट घेताना, भाडे 930 रुपये असेल आणि जेवणाचे 288 रुपये म्हणजे एकूण 1,218 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये भाडे 1,870 रुपये आणि लंचसाठी 349 रुपये, म्हणजे एकूण 2,119 रुपये असेल. यामध्ये दुपारचे जेवण सक्तीचे असेल की ऐच्छिक, याबाबत रेल्वे बोर्डाकडून कोणताही आदेश आलेला नाही. बिलासपूरहून येणाऱ्या ट्रेनमध्ये सीसीमध्ये 122 रुपये आणि ईसीमध्ये 155 रुपये कॅटरिंग शुल्क आकारले जाईल, त्यामुळे एकूण भाडे थोडे कमी असेल.


आसन व्यवस्था: 


वंदे भारत ट्रेनमध्ये 2 श्रेणीच्या आसन व्यवस्थेचा समावेश असून यात चेअरकार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. इतर एक्स्प्रेस गाड्यांशी तुलना केल्यास, चेअरकारची सीट थर्ड एसी सारखी असेल, तर 2 एसी आणि फर्स्ट एसी सारखी आरामदायी एक्झिक्युटिव्ह चेअर कार असेल. अनेक नवीन सुविधांमुळे त्यात प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


चार हजार पोलिसांचे सुरक्षा कवच


पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे स्टेशन आणि महामेट्रोचा प्रवास करणार असल्याने यावेळी त्यांच्याभोवती 4 हजार पोलिसांचे सुरक्षा कवच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पंतप्रधान तब्बल साडेतीन तास शहरात राहणार असून यादरम्यान ते शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळी पंतप्रधान सकाळी शहरात दाखल होणार आहेत. यावेळी ते प्रथम सीताबर्डी येथील रेल्वे स्टेशनला जाऊन 'वंदे 'भारत' रेल्वे सेवेची सुरुवात करणार आहेत. यानंतर मेट्रोने खापरी आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाकडे प्रयाण करतील. या दरम्यान संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात येईल.


ही बातमी देखील वाचा


PM Narendra Modi in Nagpur: समृद्धी महामार्गावर 10 किमीचा प्रवास, मेट्रोतून फेरफटका: PM मोदी यांचा असा असणार नागपूर दौरा