बीड : महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे किसानपुत्र येत्या 19 मार्च रोजी एक दिवस उपोषण करून 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन करणार आहेत. गेल्यावर्षी या दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या वर्षीही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 19 मार्च रोजी किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण (यवतमाळ जिल्हा) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पवनारला जाऊन आत्महत्या केली होती. ही दारुण घटना शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या मानली जाते. 32 वर्षांपूर्वी झालेल्या या आत्महत्येनंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी याबाबत माहिती दिली. ''हे कुठल्या एका संघटनेचं आंदोलन नाही. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करू शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. आपण व्यक्तिगत करू शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करू शकता. कामावर असताना करू शकता, हवं तर एके ठिकाणी बसून करू शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र आणि पुत्रीनी यात हिरीरीने भाग घ्यावा,'' असं आवाहन अमर हबीब यांनी केलं.
''शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे आहेत. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे,'' अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली. ''मी यंदा पवनार येथे प्रशांत हमदापूरकर, अभिजित फाळके, किशोर माथनकर, अॅड. दिनेश शर्मा या मित्रांसोबत उपोषण करणार आहे,'' असंही अमर हबीब यांनी सांगितलं.